दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता संपली (फोटो- टीम नवराष्ट्र)
Sharad Pawar: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चां राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत दिवसेंदिवस अनेक बातम्याही समोर येत असतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वाक्यात युतीच्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत. “जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, अशा संधीसाधू लोकांना आपल्या सोबत घ्यायचे नाही.” असं सांगत शरद पवार यांनी युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इतकेच नव्हे तर गांधी, नेहरू, शाहु,फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे लोकांना सोबत घ्यायचं आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना पवार देखील एकत्रित येणार, दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. दरम्यान आता या चर्चेला शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. शरद पवारांच्या विधानावर आता अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिल्यावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.”
पुण्यात काय घडले?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज पुण्यात संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी युतीच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्त शरद पवार यांच्या पक्षाचा मेळावा पार पडला. शरद पवार यांनी काँग्रेस आणि पुणे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासावर थोडक्यात प्रकाश टाकला. “या परिसरात काँग्रेसचा विचार खोलवर रुजलेला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “आपल्याला आता नव्या नेतृत्वाची फळी उभी करावी लागेल.
Sharad Pawar News: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा…?; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासकामे पुढे न्यावीत.” त्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमधील नगरपालिका व महापालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होत्या. मात्र, मध्यंतरात काही गोंधळ झाल्याने भाजपाला सत्ता मिळाली. ही सत्ता पुन्हा आपल्या हातात यावी यासाठी संघटनेला बळकट करत नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याची वेळ आली आहे,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षाची राजकीय दिशा स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेलेले नेते आणि पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्या सोबत घेणार नसल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, शरद पवारांच्या भूमिकेमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.