बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर रामदास कदम यांचे मोठे विधान...(Photo Credit -X)
मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगाव येथे पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या मेळाव्यात विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, त्यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलेल्या एका खळबळजनक आरोपाने सर्वांचे लक्ष वेधले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस ‘मातोश्री’वरच ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आपल्या भाषणात रामदास कदम म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची एकनाथ शिंदे यांनी माहिती काढावी अशी माझी विनंती आहे. मी हे विधान अत्यंत जबाबदारीने करत आहे.”
कदम यांनी पुढे म्हटले, “बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉक्टर आजही जिवंत आहेत. त्यांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेबांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता? त्यांचे अंतर्गत काय चालले होते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रामदास कदम यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला. ते म्हणाले, “माझ्या कानावर आले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते. हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते, याचीही माहिती काढा.” या सगळ्यावर बोलताना कदम म्हणाले की, “मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपत होतो. मला सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी होतं? बाळासाहेबांचे मृत्युपत्र कधी करण्यात आले, त्यावर कोणाची सही होती, ही सगळी माहिती बाहेर काढा,” असे आवाहनही त्यांनी केले.
दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांना मदत म्हणून दिलेल्या वस्तू दिसत नाहीत. हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसतात.” एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे म्हणाले, “यांचे हिंदुत्व कॉँग्रेसच्या दावणीला बसले तेव्हा संपले.”
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदासाठी , खुर्चीसाठी सगळे घालवले. पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? ह्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. गटप्रमुख नव्हे तर कटप्रमुख. शिवसैनिकच माझी संपत्ती आहे. यांना लोक सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करणार की नाही? स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना संपवणारा अध्यक्ष जगात कुठे झाला नसेल.”