Uday Samant: संजय राऊतांच्या आरोपांना उदय सामंतांचे प्रत्युत्तर; म्हणाले...
रत्नागिरी: आज राज्याचे उद्योगमंत्री उदयसामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी आज संजय राऊत, बच्चू कडू आंदोलन, कुंडमळा दुर्घटना आशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे. तर त्यांनी कुंडमळा दुर्घटनेवर संजय राऊत यांनी केलेल्या टिकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे.
कुंडमळा दुर्घटनेवर संजय राऊत यांचा आरोप काय?
खासदार राऊत म्हणाले की, “हे सरकार आल्यापासून सातत्याने अपघात घातपात, दहशवादी हल्ले सुरू आहेत, ऑपरेशन सिंदूर झालं, पहलगाम झालं, अहमदाबादला विमान हल्ला झाला. काल दोन दुर्घटना घडल्या आहेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा खचला. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. केंद्रातला आणि राज्यातला या सरकार पनवती सरकार म्हणायला हरकत नाही.
उदय सामंत यांचे प्रत्युत्तर काय?
संजय राऊत यांच्या आरोपात काही नाविन्य नाही. भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अजित पवार घटनास्थळी का नव्हते याचे उत्तर तेच देऊ शकतात. चौकशी झाल्यावर सर्व काही बाहेर येईल.
कुंडमळा दुर्घटनेची सखोल चौकशी; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
बच्चू कडू आंदोलन
बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आंदोलनस्थळी जायला सांगितले होते. आम्ही सर्वानी सांघिक निर्णय घेऊन बच्चू कडू यांना आंदोलन मागे घ्यायला लावले आहे.
पुण्यात इंद्रायणी पूल कोसळला
अनेक वर्ष जुना पूल असल्यामुळे पुलाची दयनीय अवस्था झाली होती. पूल कमकुवत झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी नवीन पुल बांधण्यासंदर्भात प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेले. आज हाच पूल पडून अनेकांचा जीव गेला तरी अनेकांना आयुष्यभरासाठी जायबंदी झाले. या दुर्घटनेस प्रशासनच जबाबदार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले. दरम्यान, कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे शेलारवाडी आणि कुंडमळा या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. या ग्रामस्थांना शेतीचे साहित्य आणण्यासाठी किंवा लोकलने प्रवास करण्याकरिता देहूगाव किंवा तळेगाव येथून तब्बल आठ ते दहा किलोमीटरचा वळसा घालून ये – जा करण्याची वेळ आली आहे.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार
जखमी व्यक्तींना पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीस बाहेर काढण्यात आले. सदर बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे / पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल व स्थानिक बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी उपस्थित आहे.