कुंडमळा दुर्घटनेची सखोल चौकशी; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
Follow Us:
Follow Us:
पुणे, शहर प्रतिनिधी : कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेबाबत सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले. दरम्यान दुर्घटनेसंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे माहिती मिळाल्यानंतर केवळ वीस मिनिटांमध्ये मदत कार्यास सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत ५० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याचे डूडी यांनी सांगितले. तसेच जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, बहुतांश जखमी धोक्याबाहेर आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही, असेही डूडी म्हणाले.
दुर्घटनेसंदर्भात दुपारी साडेतीन वाजता माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने यंत्रणा सज्ज करण्यात आल्या. आणि केवळ वीस मिनिटांमध्ये मदतकार्यास सुरुवात करण्यात आले. ही घटना गंभीर असून गेल्या आठवड्यातच लोणावळा तसेच मावळ परिसरातील पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जमले होते. त्यामुळे बंदीचे आदेश असतानाही पर्यटकांना मज्जाव का करण्यात आला नाही, यासंदर्भात चौकशी करण्यात येईल. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
ही समिती सर्व घटकांचा विचार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करेल. यात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही डुडी यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान लोणावळा व मावळ परिसरात यापुढे पर्यटकांना मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी या परिसरात पावसाळी पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Web Title: Thorough investigation into the kundamala tragedy committee formed under the chairmanship of additional district magistrate