भाईंदर/ विजय काते : शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मेट्रो समांतर पुलांचे काम वेगाने पूर्ण होत असले तरी त्याच्या उद्घाटनास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. साईबाबा नगर ते शिवार गार्डन दरम्यानचा पूल पूर्ण होऊनही अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
मिरा-भाईंदरमध्ये प्रवेशासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल्डन नेस्ट हा मुख्य मार्ग आहे, आणि यालाच अनेक पर्यायी रस्ते जोडलेले आहेत. परिणामी, या चौकांमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मेट्रो मार्गाला समांतर तीन पूल उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. यातील प्लेझंट पार्क ते सिल्वर पार्क सिग्नल दरम्यानचा पहिला पूल काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आता साईबाबा नगर ते शिवार गार्डन पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यास उशीर होत असल्याने रहिवाशांत प्रचंड असंतोष आहे.
स्थानिक राजकीय नेत्यांनी हा पूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे, असा आग्रह धरल्याचे समजते. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे वेळ मागण्यात आली असून, अद्याप वेळ मिळालेली नाही. त्यामुळे पुलाचे लोकार्पण रखडले असून, वाहतुकीसाठी खुला करण्यास उशीर होत आहे.
या प्रकरणी मिरा-भाईंदर काँग्रेस आक्रमक झाली आहे. युवक काँग्रेसचे सिद्धेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुलाजवळ आंदोलन केले. “नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पुलाचे त्वरित उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करावा,” अशी काँग्रेसने मागणी केली आहे.”मुख्यमंत्र्यांच्या वेळेची वाट पाहण्याऐवजी नागरिकांच्या सोयीचा विचार करा. वाहतूककोंडीमुळे शेकडो लोकांना रोज अडथळे येत आहेत. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन पूल उघडावा, अन्यथा काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी पुलाची पाहणी केली होती. त्यांनी हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, पुलाचे काम पूर्ण होऊनही नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.वाहतूककोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी हा पूल तातडीने खुला करण्याची मागणी केली आहे.”राजकीय नफा-तोट्याच्या गणितात नागरिकांच्या त्रासाचा विचार व्हावा. पूल तयार झाला आहे, मग उशीर कशासाठी? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच्या अटीपेक्षा जनतेच्या सोयीला प्राधान्य दिले पाहिजे,” असे स्थानिक रहिवासी सांगत आहेत.मेट्रो समांतर पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास मिरा-भाईंदरच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन हा पूल लोकांसाठी खुला करावा, अन्यथा वाढती वाहतूककोंडी आणि नागरिकांचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे.