
Narendra Mehta
माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-1 ने चौकशी सुरू केली. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे पत्रकार निलेश फापाळे यांनीही अनेक संशयास्पद नोंदी समोर आणल्याचे सांगण्यात आले आहे.चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या असून काही संशयितांनी स्थानिक रहिवासी दाखला मिळवण्यासाठी एकाच क्रमांकाची जन्म प्रमाणपत्रे, रेशन कार्डे आणि वीज बिले वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. सहा व्यक्तींच्या जन्म प्रमाणपत्रांवर समान नोंदणी क्रमांक आढळला असून संबंधित प्रमाणपत्रे महानगरपालिकेकडून जारीच करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासात 25 हून अधिक प्रकरणांमध्ये बनावट रेशन कार्डांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये इतर व्यक्तींच्या वीज बिलांवरील नाव व पत्ता बदलून ती कागदपत्रे खरी असल्याचे दाखविण्यात आल्याचेही उघड झाले आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांच्या नोंदींच्या पडताळणीत अनेक कागदपत्रे संशयास्पद आढळल्याची माहिती आहे.याशिवाय पुणे छावणी येथील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाच्या नावाने बनावट जन्म प्रमाणपत्रे तयार करून सादर केल्याचाही संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.पोलीस तपासानुसार, काही संशयितांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली, सरकारी शिक्के व सीलचा वापर केला आणि त्याद्वारे स्थानिक रहिवासी दाखले मिळवून पुढे रिक्षा बॅज प्राप्त केले असावेत. या प्रकरणात कागदपत्रे तयार करणारे, पुरवणारे आणि मदत करणारे अज्ञात व्यक्तीही तपासाच्या कक्षेत आहेत.
दरम्यान, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आज पत्रकार परिषदेत परिवहन विभागावर गंभीर आरोप करत म्हटले की, “परिवहन विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून पैसे घेऊन दाखले आणि बॅज दिले जातात. याबाबत आम्ही परिवहन मंत्र्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. संबंधित अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, यासाठी पुढील काळात लेखी मागणी करणार असल्याचेही मेहता यांनी स्पष्ट केले. सध्या काशिगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून तपासातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.