
मीरा-भाईंदर/ विजय काते : 4 वर्षांपासून सुरू असलेल्या नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला यश मिळाले आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अखेर उत्तन-डोंगरी येथील मेट्रो-9 च्या डिपो योजनेला रद्दबातत ठरवले असून, तब्बल 733कोटींचा ठेका रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांच्या दीर्घ संघर्षाला यश मिळाले असून, हा उत्तनवासीयांचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची औपचारिक घोषणा करत नागरिकांना दिलासा दिला. त्यांनी सांगितले की, “उत्तनमध्ये आता मेट्रो कारशेड होणार नाही. स्थानिकांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या भावना आणि पर्यावरणाच्या जपणुकीचा विचार करून सरकारने जनहिताचा निर्णय घेतला आहे.”
मेट्रो डिपोप्रमाणेच उत्तन डम्पिंग ग्राउंड हीही परिसरातील मोठी समस्या होती. या ठिकाणी दररोज हजारो टन ओला कचरा येत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरत होती. यावरही कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.त्यांनी सांगितले, “लवकरच उत्तन डम्पिंग ग्राउंडवर एकही ट्रक ओला कचरा आणला जाणार नाही. ओल्या कचर्यावर प्रक्रिया करून त्याचे खतात रूपांतर करण्यात येईल. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे.”सरनाईक यांच्या या निर्णयाचे शहरातील नागरिक, सामाजिक संघटना आणि स्थानिक पर्यावरणप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे. नागरिकांचा दीर्घ संघर्ष आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अखेर सरकारने जनहिताचा मार्ग स्वीकारला आहे.आजच्या या निर्णयामुळे उत्तनवासीयांना खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता येईल, असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले आहे.