'कृषीमंत्री जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त, मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्याला...', मनसेचा कोकाटेंवर हल्लाबोल
महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर आता भर सभागृहात मंत्रीच रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर “जंगली रमी” गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आला असून वादात सापडले आहेत. या प्रकरणावर सध्या सगळीकडून टीकेचा भडिमार सुरू असताना आता मनसेने कोकाटे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
काय म्हणाले यशवंत किल्लेदार?
मनसेचे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी कोकाटे यांच्यावर टीका करताना म्हटले की,”कृषीमंत्री महाराष्ट्रात जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त आहेत. त्यांची फळं महाराष्ट्रातील तरुण पिढी आणि बळीराजा भोगत आहे.”महाराष्ट्र विधानसभेचा बहुमोल वेळ मंत्री महोदय सत्कारणी लावताना पाहून राज्याची खूपच प्रगती झाली आहे असे वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच या मंत्र्यांना आता काम नसल्यामुळे घरी बसवायला हरकत नाही.”
रोहित पवार काय म्हणाले?
व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांनी कोकाटे यांच्यावर खोचक टीका केली. “जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, अशी टीका केली होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले होते की, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायचे झाले, तर भाजप श्रेष्ठींना विचारू.” त्यावर रोहित पवार यांनी उत्तर देताना माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ शेअर करत टोला लगावला आहे.
Rohit Pawar News: जंगली रमी पे आओ ना महाराज…; रोहित पवारांकडून कृषीमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
माणिकराव कोकाटेंचा खुलासा
“मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात (विधानसभेत) काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी मी युट्यूब ओपन केलं होतं. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला.”