MNS : जामदा प्रकल्प क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात मनसे आक्रमक; मनसेच्या अविनाश सौंदळकरांकडून सखोल चौकशीची मागणी, सौजन्य : सोशल मीडिया
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जामदा प्रकल्पाच्या क्षेत्रात होत असलेल्या कथित अनधिकृत बांधकामांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS) अविनाश सौंदळकर तसेच मनसेच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्रस्तावित जामदा प्रकल्पाच्या परिसरात काही ठिकाणी बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास येत असून, ही बांधकामे कोणत्या परवानग्यांच्या आधारे सुरू आहेत, याची तपासणी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी प्रस्तावित क्षेत्रात अशा प्रकारची बांधकामे होत असल्यास भविष्यात प्रकल्पाच्या कामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
या बांधकामांना संबंधित शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाची परवानगी आहे का?, बांधकामांसाठी आवश्यक कागदपत्रे व मंजुरी घेण्यात आली आहे का?, तसेच प्रकल्पाच्या प्रस्तावित क्षेत्रात बांधकाम करण्यास नियमांनुसार परवानगी आहे का?, याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
प्रस्तावित प्रकल्पाच्या दृष्टीने संबंधित विभागांनी संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामांची नोंद घ्यावी. तसेच अनधिकृत बांधकामे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी अविनाश सौंदळकर यांच्यासह मनसे तालुका कार्यकर्त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची प्रशासनाकडून सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन कोणती कार्यवाही करते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.






