पुणे : कोथरुड भागात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगार सागर येनपूरे आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई केली आहे. टोळीत पाच जणांचा समावेश असून, पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत शहरातील तब्बल १०४ टोळ्यांवर कारवाई केली आहे.
सागर उर्फ मांडी तानाजी येनपूरे, साहिल विनायक जगताप, अक्षय दामू वाळुंज, सुरेश कालीदास वाजे, वैभव उर्फ भोऱ्या प्रदीप जगताप (सर्व रा. केळेवाडी, पौड रस्ता, कोथरुड) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
कोथरूडमधील पौड रस्ता तसेच केळेवाडी भागात येनपूरे व त्याच्या टोळीने दहशत माजविली होती. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर देखील आरोपी वर्तणुक सुधारत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे यांनी मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला.
प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत तो प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला. तसेच, आयुक्तांनी येनपूरे टोळीच्या प्रस्तावावर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. गेल्या दीड वर्षात शहर परिसरातील १०४ गुंड टोळ्यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशाने मोक्का कारवाई करण्यात आली आहे.