अकलुज : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी डावललेल नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या १४ एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून, १६ एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे. शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंबाचे संबंध जुने आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली असे सांगत माढ्याबाबत ‘वेट अँड वॉच’ अशी प्रतिक्रिया मोहिते पाटील यांनी दिली.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या आधी शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूज येथे एक मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर १६ एप्रिल रोजी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासोबत ते अर्ज दाखल करणार आहेत. मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी होणार असून शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिल्यानंतर त्याला धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केला होता. भाजपने माढ्यातील उमेदवार बदलावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण भाजपने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. या दरम्यान मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्याचा भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तरीही धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायच ठरवलं असून ते माढ्यातून अर्ज भरणार आहेत.
रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेल्या रामराजे निंबाळकरांनीही विरोध केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर कुटुंबीयांच्या भेटीगाठी होत आहेत. या परिस्थितीत महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भूमिका घेतात हे देखील महत्वाच ठरणार आहे.
सोशल मीडियावर सक्रीय
धैर्यशील मोहिते-पाटील एक उच्चशिक्षित राजकारणी आणि उद्योजक आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचे महत्त्व ओळखून आहेत. ते सातत्याने आपल्या कामाची प्रसिद्धी सोशल मीडियावर करत असतात. गावभेटी, कार्यकर्त्यांची केलेली कामे, मतदारसंघातील प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती ते शेअर करत असतात.