
मोहोळमधील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था; आमदार राजू खरे यांची शिक्षणमंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी
मोहोळ मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून विद्यार्थ्यांना असुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे आमदार खरे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांचीही कमतरता असल्याने विशेषतः विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Daund Politics: दौंडच्या १७ नगरसेवकांनी गेम फिरवला!पुणे आमदारकीच्या समीकरणात मोठा बदल
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. पडझड झालेल्या शाळांच्या जागी नवीन वर्गखोल्या उभारणे, सर्व शाळांमध्ये आधुनिक व पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे तसेच दुरुस्तीच्या कामांसाठी शासनाकडून विशेष निधी मंजूर करण्याच्या प्रमुख मागण्या आमदार खरे यांनी केल्या.
दरम्यान, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मोहोळ मतदारसंघातील शाळांची परिस्थिती गांभीर्याने घेत लवकरच दुरुस्ती व नवीन बांधकामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती आमदार राजू खरे यांनी दिली.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शिक्षणाच्या सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. वर्गखोल्यांची पडझड आणि मूलभूत सुविधांचा अभाव ही अत्यंत गंभीर बाब आहे. मोहोळ मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील. ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भविष्याशी मी तडजोड करणार नाही.” अशी प्रतिक्रिया आमदार, मोहोळ विधानसभा मतदारसंघ राजू खरे यांनी केली.
याशिवाय, अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होत असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच ज्या शाळांमध्ये वर्गखोल्यांची कमतरता आहे तेथे नवीन वर्गखोल्या उभारण्यास मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार खरे यांनी केली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.