नवी मुंबईतील 'या' भागात नाल्याची तात्काळ सफाई करण्याची मनसेची मागणी (फोटो सौजन्य-X)
नवी मुंबई: दोन दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साकीनाक्यात मध्ये नाल्यात उतरून व्हॉलीबॉल खेळत अनोखं आंदोलन केले. साकीनाक्यातील सत्यनगर नाल्यात मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि इतर पदाधिकारी उतरले.नालेसफाईबाबत प्रशासन टोलवाटोलवी करत असल्यानं हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं.हाच कचरा पालिकेच्या कार्यालयात नेऊन टाकू असा इशारा महेंद्र भानुशाली यांनी दिली. याचदरम्यान आता घणसोली सेक्टर ९ अमृत योजनेलगत असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहेत. तसेच इतर कचरा देखील मोठ्या प्रमाणात असल्याने, वाढत्या डासांचा प्रादुर्भाव पाहता पालिकेने तात्काळणारा साफ करण्याची मागणी, मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण यांनी केली आहे.
पावसाळा आता उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. अशातच घणसोली सेक्टर ९ अमृत योजने लगत असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहेत. तसेच इतर कचरा देखील मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे पाणी साठवून डासांची संख्या वाढत आहे. अशातच या ठिकाणी नागरिक व लहान मुले मोठ्या प्रमाणात चालण्यासाठी येत असल्याने, वाढत्या डासांचा त्रास या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या सात दिवसात या नाल्यांची सफाई करण्यात यावी या आशयाचे पत्र, मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण यांनी महापालिकेला दिले आहेत येथे. आठवडाभरात नाल्याची साफसफाई झाली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
दरम्यान नालेसफाईतील दिरंगाईमुळे दरवर्षी मान्सूनमध्ये जलभरावाचा धोका व्यक्त होतो. पावसाळ्याआधी नालेसफाईची कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे नाल्यांचा प्रवाह वाढत नसल्याने पावसाचे पाणी मुंबई ठाण्यासारख्या शहरात वाट मिळेल तिथे प्रवाहीत होते. मुंबईतील कुर्ला, माटुंगा, परेल, भारतमाता, मिलन सबवे अशी सखल ठिकाणे पाणी तुंबण्यासाठी दरवर्षी चर्चेत येतात. यंदाही मुंबई आणि ठाण्यातील नालेसफाईचे चित्र अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे त्यांची आकडेवारी उजेडात आलेली नाही. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही आकडेवारी समाधानकारक असावी अशी मुंबई ठाणेकरांची अपेक्षा आहे. ठाणे स्टेशन परिसरातील नालेसफाई स्वच्छतेची कामे वेळीच पूर्ण करण्याचे निर्देश ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी दिले आहेत, परंतु पालिकांना खरंच ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध आहे का, हा खरा प्रश्न आहे. ठाण्यातही यंदा जलभरावाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाण्यात नालेसफाईच्या दाव्यातील विसंगती कायम आहे.