
नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अख्ख जग सज्ज झालं आहे. अश्यातच नवी मुंबई पोलिसांनी देखील विशेष खरदारी घेतली आहे. शांतताप्रिय असलेल्या या शहरात या नवीन वर्षाचं स्वागत शांततेत तसेच कायद्याच्या चौकटीत व्हावं यासाठी तब्ब्ल अडीच हजार पोलीस अधिकारी वा कर्मचाऱ्यांचा फौज फाटा नवी मुंबई पोलिसांनी उतरवला आहे. यामध्ये ड्रिंक अँड ड्राइव्ह, ओव्हरस्पीडिंग, बेकायदेशीर रेव्ह पार्टी आणि ड्रग्स विक्रीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी उभारण्यात आली असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लब रात्री 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस आहेत. त्या फार्म हाऊस वर होणाऱ्या पार्ट्या यावर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी सध्या वर्दीतील पोलीस तैनात असणार आहे. मद्यपान ना करता वाहन चालवण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. मद्यपान केलेल्यांनी टॅक्सी अश्या तत्सम प्रवासी वाहतुकीचा वापर करावा असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यंदाच्या वेळी निवडणुकीचा काळ आल्याने उत्साहा मोठ्याप्रमाणात साजरा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करत त्यानुसार योग्य ती काळजी घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे.
तसेच या काळात नवी वर्षाच्या शुभेच्छांसाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तेव्हा नागरिकांनी नवीन वर्षाच्या कुठल्या स्कीम बाबत अथवा तत्सम अमिष देणाऱ्या कोणत्याही ‘एपीके‘ फाईल ओपन करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे, जेणेकरून सायबर फ्रॉड होण्यापासून बचाव होईल.
पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. निवडणुकीचे दिवस असल्यानं आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कुठंही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीनं संध्याकाळनंतर जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हविरोधात ट्रॅफिक पोलिसांचा विशेष बंदोबस्त आहे.