पुण्यात आगीचा भडका; 100 हून अधिक दुकाने अन् भंगार गोदामे जळून खाक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगार गोदामांना सोमवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की विझवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दल विभागाची सर्व 15 अग्निशमन वाहने, याशिवाय, पुणे महापालिकेची पीएमआरडीएची आणि टाटा मोटर्ससारख्या अनेक खाजगी कंपन्यांची अग्निशमन वाहने तैनात करण्यात आली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज सकाळी 10.30 वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळाली की , कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगार गोदामांना आग लागली. या आगीत 100 हून अधिक दुकाने आणि भंगार गोदामे जळून खाक झाली. या घटनेने शहरभर धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अग्निशमन विभागाचे प्रमुख मनोज लोणकर यांनी सांगितले की, आता आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी थोडा वेळ लागेल, आणि किती दुकाने जळून खाक झाली हे अद्याप आम्हाला कळू शकलेले नाही.”
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; जैन मंदिरात घुसून चोऱ्या करणाऱ्याला घेतले ताब्यात
कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत भूतकाळात या ठिकाणाहून लहान-मोठ्या औद्योगिक युनिट्स आणि भंगार गोदामांना आग लागण्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या होत्या. यावर्षी एप्रिलमध्ये देखील या परिसरात भीषण आग लागली होती.
भंगार गोडाऊन जळून खाक
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली हडपसर भागातील वैदुवाडी येथे एका भंगार मालाच्या गोडाऊनला शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत गोडाऊन जळून खाक झाले आहे. पाण्याचा मारा करून काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही.
वैदुवाडी परिसरात रामटेकडी सुरक्षानगर जुनी म्हाडा कॉलनी आहे. त्याशेजारी १५ गुंठ्यात हे प्लास्टिक भंगारचे मोठे गोडाऊन आहे. शनिवारी रात्री अचानक या गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे लक्षात आले. लागलीच नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना दिली. तत्काळ हडपसर पोलीस व अग्निशमन दलाला दिली. या माहितीवरून पोलीस व अग्निशमन दलाचे जवाण पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत या आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी पुण्याचा प्रचंड मारा केला आणि आग आटोक्यात आणली.