
पुणे पुस्तक महोत्सवाला साडेबारा लाख नागरिकांनी दिली भेट
३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी
५० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल
पुणे: पुणे पुस्तक महोत्सवात साडेबारा लाख नागरिकांनी भेट देत सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली असून, त्यातून सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांची विक्री आणि पुस्तक खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पुणे उस्तक महोत्सवात ६० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांचा सहभाग होता. त्यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी ठरला असून, आता हा महाराष्ट्राचा महोत्सव झाला आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२५ ची सांगता रविवारी झाली. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव संयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पांडे यांनी माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. आनंद काटीकर आदी उपस्थित होते.
Pune Book Festival: शांतता… पुणेकर वाचत आहेत’! 1 लाखांपेक्षा अधिक फोटोज..
पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवात एकूण साडेबारा लाख नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये तरुण – तरुणींची आणि शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होते. त्यामुळे वाचन चळवळ सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे पुस्तक महोत्सवाचा प्रवास सुरू आहे. मोबाईल आणि गॅजेट्सच्या दुनियेतून बाहेर पडून नागरिक आणि तरुण पुस्तकांमध्ये रमल्याचे सकारात्मक चित्र येथे पाहायला मिळाले. लेखकांशी संवाद साधण्यासाठी आणि स्वाक्षरी घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा ही पुण्याच्या जागृत वाचन संस्कृतीची पावती आहे. गेल्यावर्षी साधारण २५ लाख पुस्तकांची खरेदी नागरिकांनी केली होती. यातून सुमारे ४४ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. यंदा दोन्ही प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केल्याने सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. पुस्तक खरेदी करणाऱ्यांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. पुणे पुस्तक महोत्सवात यंदा एकूण तीन विश्वविक्रम करण्यात आले. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली.
मंठाळकर म्हणाल्या, पुणे पुस्तक महोत्सवात शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक महाविद्यालये आणि शाळा विद्यार्थ्यांना घेऊन, पुणे पुस्तक महोत्सवात आल्या. ग्रंथपालांचे संमेलन उत्साहात झाले. त्यात २०० पेक्षा अधिक ग्रंथपाल सहभागी झाले होते. या ग्रंथपालांनी आपल्या महविद्यालयांसाठी भरभरून पुस्तक खरेदी केल्याचे मंठाळकर यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, पुस्तक महोत्सवात वाचक मेळावा दिवसभर उत्साहात रंगला होता. पुण्यासह राज्यातील विविध शहरांमधील वाचक यात सहभागी झाले होते, असे फडणवीस यांनी सांगितले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, समर्थ युवा फाऊंडेशन, कोहिनूर ग्रुप, सुहाना मसाले आदी सर्व संस्थांच्या सहकार्याने महोत्सव यशस्वी झाला, अशी माहिती प्रा. चाकणे यांनी दिली.
पुढच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव १२ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. आगामी महोत्सव अधिक चांगला आणि भव्य होण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. या महोत्सवाबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता असल्याने, आवश्यक त्यावेळी माहिती देण्यात येईल, अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली.
Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट
पुणे हे पुस्तकांच्या खरेदीची बाजारपेठ झाली आहे. राज्यभरातून अनेक नागरिक पुस्तक खरेदीसाठी आले होते. हा संयोजकांचा नाही तर, नागरिकांचा पुस्तक महोत्सव झाला आहे. महोत्सवात सर्व भाषिक पुस्तकांची दालने असल्याने, सर्व भाषिक नागरिकांची संख्या होती. यंदा अनेकजण सहकुटुंब आले, ही फार सकारात्मक बाब आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, पुणे लिट फेस्टिव्हल आणि चिल्ड्रेन कॉर्नर अशा तिन्ही ठिकाणचा उत्साह कमालीचा होता. पुणे पुस्तक महोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राचा महोत्सव झाला आहे. यासाठी सर्व पुणेकरांचे मनापासून आभारी आहोत. आगामी पुणे पुस्तक महोत्सव आणखी भव्य आणि नावीन्यपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
– राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
पुणे पुस्तक महोत्सवाची वैशिष्ट्ये
– पुणे पुस्तक महोत्सवाला ९ दिवसात १२.५ लाख नागरिकांची भेट
– ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी
– एक हजार साहित्यिकांनी महोत्सवाला भेट दिली
– सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल
– ४०० शाळांमधील ३० हजारहून अधिक विद्यार्थी ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये सहभागी झाले.
– महोत्सवात आलेल्या नागरिकांपैकी ६० टक्क्यांहून अधिक तरुण वाचक दिसले.
– महोत्सवातर्फे एक लाख तरुणांना दिलेल्या कूपन्सद्वारे १ कोटी १० लाखांहून अधिक किमतीची पुस्तके खरेदी करण्यात आली.
– दोनशेहून अधिक सार्वजनिक, शाळा, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ ग्रंथालयांनी येथून लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली.
– महोत्सवात विक्रमी ४९८ पुस्तकांचे प्रकाशन झाले.
– बाराशेहून अधिक लेखक, साहित्यिक व कवी विविध व्यासपीठावर सहभागी झाले. याशिवाय वाचकांचे संमेलनही झाले.
– ज्ञान सोहळा असलेल्या ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये १२२ नामवंत वक्त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला
– १५० पेक्षा अधिक दालनांवर पुस्तक प्रकाशन झाले.