सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसात म्हणजेच शनिवारी आणि रविवारी दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी करत पुस्तक खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. यामध्ये युवक, युवतींचा सहभाग हा लक्षणीय होता. अनेक नागरिकांनी एकापेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन दिवसांच्या पुस्तक खरेदी- विक्रीतून काही कोटींची उलाढाल झाल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे शनिवारी जल्लोषपूर्ण वातावरणात उद्घाटन झाल्यानंतर, नागरिकांकडून पुस्तक खरेदीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी पाहायला मिळाली. साधारण ७० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी हजेरी लावली. अशा प्रकारची गर्दी ही शेवटच्या दिवशी पाहायला मिळत असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
पांडे म्हणाले, पहिल्या दोन दिवसातच महोत्सवाच्या दोन्ही मंडपामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध विषयांवरील पुस्तकांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीत परदेशी नागरिकांचाही सहभाग पाहायला मिळाला. शनिवारी सकाळपासून ते रविवारी सायंकाळपर्यंत सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. पुस्तकांच्या खरेदीवर १० टक्क्यांची सवलत दिली जाते. त्याचप्रमाणे नामवंत प्रकाशकांकडूनही काही प्रमाणात पुस्तक खरेदीवर सवलत देण्यात येत आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोमवारी १५ डिसेंबरला पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन, प्रकाशक आणि वाचकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित गिनीजगाथा या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि संचालक युवराज मलिक उपस्थित राहणार आहेत.






