नागपुरात तणावपूर्ण शांतता
मुंबई : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरवरुन दंगल झाली आहे. यामुळे नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. जमावाने दगडफेक, जाळपोळ केली असून पोलिसांवर देखील हल्ला केला. या दंगलीमध्ये तब्बल 34 पोलीस जखमी झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले आहे. नागपूरमधील काही भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यावरुन मात्र आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ही दंगल आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पाहिली असती तर दंगलखोर कुठल्या जातीच्या, कुठल्या पक्षाचा, कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारखा राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावले उचलतील. हे दंगल पेटवणारे कोण आहेत आणि दंगली का पेटवली जात आहे? गुढीपाडव्याला देखील दंगली उसळण्याचा आपलीच लोक प्रयत्न करतील. औरंगजेबाची ढाल करून काही लोक महाराष्ट्रात दंगल उसळत आहे,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “सरकार तुमचं आहे तर दंगली कशाला भडकवत आहात? मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी कुदळ फावडा घेऊन जावं आणि लोकांच्या इच्छा या पूर्ण कराव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं ते मेमोरियल आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं महत्त्व कमी करायचं. महाराष्ट्राच्या जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे,” असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी बाबरीचं आंदोलन हे वेगळं होतं अशी भूमिका मांडली. ते म्हणाले की, “बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा लढा हा राम मंदिरासाठी होता. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन दंगली पेटवत आहेत तर हे गृहमंत्र्यांचा फेल्युअर आहे. ही लोकं कोण आहेत दंगे पसरवत आहेत? ही विश्व हिंदू परिषदेची लोक आहेत किंवा संघाची लोक आहेत. त्यांचे चेहरे कळत आहेत. फडणवीसांना ती लोक माहित असतील,” असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “हिंदूंना भडकविण्यासाठी हिंदूंवर हल्ले केले जात आहेत, हा नवीन पॅटर्न आता सुरू आहे. महाराष्ट्रात हा नवीन दंगल पॅटर्न तयार झालेला आहे. अशा दंगली पेटून 2029 च्या निवडणुकींना सामोरे जायचं असा हा दंगल पॅटर्न आहे. औरंगजेबाच्या कबरीचे उदत्तीकरण हे महाराष्ट्रात कोणीही करू नये, तुमचीच माणसं हे करत आहेत. इतिहास मान्य केल्यावर तुमची माणसं जर कुदळ फावडी घेऊन तिकडे गेली असती तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा हे संघटित गुन्हेगार आहेत,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.