Photo Credit- Social Media ( नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यास नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची संधी मिळणार )
Nagpur Violence News : नागपूर : औरंगजेबाच्या कबरच्या वादावरुन नागपूरमध्ये दंगल झाली आहे. काल रात्री (दि.17) नागपूरमध्ये मोठ्या जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. वाहनांची तोडफोड तसेच पोलीस दलावर देखील दगडफेक केली. जेसीबी जाळण्यात आला. यामुळे नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असून नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागांतील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. या दंगलीवर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये मोठ्या जमावाने दंगल केली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी सध्या तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले तरी देखील तणावपूर्ण परिस्थिती आहे. या घटनेमुळे औरंगजेब कबर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरामध्ये साजरी केली जात असताना हा प्रकार घडल्यामुळे यावर जोरदार रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शांतता राखण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले नितीन गडकरी?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर दंगलीवर प्रतिक्रिया दिली. यावर ते म्हणाले की, “नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली. अशा सर्व परिस्थितीमध्ये नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास ही नागपूरची विशेषता राहिली आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “नागपूरमध्ये शांतता प्रस्तापित करावी. आणि कोणीही रस्त्यांवर उतरु नये. सगळ्यांनी कायदा व व्यवस्थेला सहकार्य करावं. सलोख्याचे आणि सदोर्हाचे वातावरण कायम ठेवावे. शांतता ठेवण्याची नागपूरची ही जी परंपरा आहे ती कायम ठेवावी. ज्या लोकांनी चूका केल्या असतील किंवा ज्या लोकांनी गैर कायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. असा विश्वास देखील सर्वांना देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भातील सर्व माहिती मिळालेली आहे. पण आपण कोणत्याही अफवांवर लक्ष न ठेवता सहकार्य करावं. प्रेमाचं आणि उत्तम वातावरण ठेवण्यासाठी मदत करावी. पोलिसांना सहकार्य करावं,” अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नागपूर हिंसाचार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नागपूरच्या महाल भागामध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय अयोग्य आहे. अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होणं हे अत्यंत चुकीचं आहे. माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. नागपूर शहर हे एकोप्याने राहणारे शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतले जाईल. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी याठिकाणी शांतता ठेवावी,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे.