सातारा : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे (Udayanaraje Bhosale) आणि साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhosale) यांच्यात बुधवारी झालेल्या वादानंतर आज या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. साताऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनावरुन बुधवारी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर ही भेट झाली आहे.
भाजपा आणि शिंदे गटाच्या दृष्टीनं सातारा जिल्हा महत्त्वाचा मानण्यात येतोय. त्यात या दोन राजांच्या भांडणाचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. निवडणुका तोंडावर असताना असा वाद पक्षाला परवडणारा नाही. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांशी फडणवीस यांनी चर्चा केल्याचं सांगण्यात येतंय. फडणवीस यांची या दोन्ही राजांमधील शिष्टाई सफल झाली का, हे पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सातारा शहर आणि जिल्ह्यावर वर्चस्वाची उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात लढाई आहे. त्यामुळे फडणवीसांच्या भेटीनं हा वाद संपणार की पुढंही सुरुच राहणार हा प्रश्न आहे.
बुधवारी काय झाला होता वाद?
साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे हा वाद असा पुन्हा उफाळलेल्या पाहायला मिळालं होतं. खिंदवाडीतल्या एका जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आमदार शिवेंद्रराजे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार होतं. कंटेनर तात्पुरतं कार्यालय म्हणून उभारण्यात आलं होतं. मात्र, हा कंटेनर खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उलटवला. त्यावरुन दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. अखेरीस पोलिसांनी मध्यस्थी करुन जमाव पांगवला होता.
उदयनराजेंचा दावा
ही जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा उदयनराजेंनी केला आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याचं सांगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढं हे सगळं मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
शिवेंद्रराजेंचा दावा
तर दुसरीकडं कृषी उत्पन्न बाजार समितीत यश मिळवलेल्या शिवेंद्र राजे यांनी भूमीपूजन घडवून आणलंच. ही जमीन सरकारकडून अधिग्रहित केली असल्याचं आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केल्याचं शिवेंद्रराजे यांचं म्हणणंय. बाजार समितीत झालेल्या निवडणुकांत दिलेलं आश्वासन पूर्ण करत असल्याचा दावा त्यांनी केला होता.