
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून 'या' भागांत १० टक्के पाणीकपात (Photo Credit- X)
मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने घेतला आहे. त्याचचरोबर महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील विभागांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. या कालावधीत मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषतः पूर्व उपनगरात आधीच पाण्याची समस्या असताना या दुहेरी समस्याचा सामना करावा लागणार आहे.
शहरातील ‘ए’ विभागातील नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र, ‘बी’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘सी’ विभागातील भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला परिसर, ‘ई’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘एफ दक्षिण’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘एफ उत्तर’ विभागातील संपूर्ण परिसर, पूर्व उपनगरांतील ‘टी’ विभागातील मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) परिसर, ‘एस’ विभागातील भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) परिसर, ‘एन’ विभागातील विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर परिसर, ‘एल’ विभागातील कुर्ला (पूर्व), ‘एम पूर्व मधील संपूर्ण विभाग, ‘एम पश्चिम’मधील संपूर्ण विभागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील ‘हॉटेल डिप्लोमसी’
मुंबई महानगरपालिकेला पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम २७ जानेवारी ते ७ पेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमधील महापालिकेच्या बहुतांश प्रशासकीय विभागांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील काही भागांमध्ये ही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.
सर्व संबंधित परिसरांमधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.