ABVP : मराठी शाळा बंद न करण्याचे अभाविपचे आवाहन, राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेत केली सविस्तर चर्चा
नीता परब/मुंबई
राज्यातील शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) शिष्टमंडळाने शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अभाविपने यापूर्वी शासनाकडे सादर केलेल्या 15 कलमी निवेदनासह प्रवेश प्रक्रिया, शिक्षक भरती, संचमान्यता, मराठी शाळांचे सक्षमीकरण, परीक्षांमधील गैरप्रकार, खासगी शिकवणी वर्ग तसेच ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणी यांसंदर्भात विविध सूचना व मागण्या मांडल्या.
टीईटी तसेच इतर परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभाविपच्या वतीने यावेळी करण्यात आली.
तसेच 2016 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या टीईटी प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेची माहिती व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही अनेकदा दीर्घकाळ सुरू राहत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे अभाविपने निदर्शनास आणून दिले. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढली असली तरी तांत्रिक अडचणी, प्रवेश वाटपातील त्रुटी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली. इयत्ता 12 वीतील प्रवेश तसेच महाविद्यालय बदलण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
कमी पटसंख्येच्या आधारे मराठी व शासकीय शाळा बंद करण्याऐवजी त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी स्वतंत्र कृतीआराखडा आणि विशेष कृतीदल स्थापन करावे, अशी मागणी अभाविपने केली.
शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, टीईटी-टॅट परीक्षांचे निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्गांमधील अनैतिक संगनमतावर नियंत्रण आणावे, एकात्मिक शिकवणीच्या शुल्कावर नियमन करावे तसेच शाळा-महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांच्या वेळांमध्ये योग्य अंतर ठेवावे, अशी मागणी अभाविपने केली. यासोबतच संचमान्यता, आधार पडताळणी, यू-डायस संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
Diveagar Breaking: मन सुन्न करणारी घटना! दिवेआगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
तसेच मुंबई व परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत स्वतंत्र संवाद आयोजित करून प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. तसेच ऑनलाइन प्रक्रिया, प्रवेश वाटप आणि संचमान्यतेसंदर्भातील सविस्तर सूचना शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे अभाविपच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अथर्व कुलकर्णी, देवगिरी प्रांतमंत्री वरुणराज नन्नवरे, कोकण प्रांत सहमंत्री शांतनू बिरोजे, मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार, मुंबई महानगर सहमंत्री सानिका जोशी आणि अलका यादव यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.






