म्हाडाच्या अर्जदाराला न्याय (फोटो- सोशल मिडिया)
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये आयोजित २० टक्के सर्वसमावेशक योजनेच्या सोडतीत श्री. ज्ञानेश्वर गरकळ विजेते ठरले होते. त्यांनी सदनिकेची संपूर्ण विक्री किंमत अदा केली होती. मात्र, संबंधित विकासकाकडून पायाभूत सुविधा विकास शुल्काच्या नावाखाली वाढीव रकमेची मागणी करण्यात येत असल्याने सदनिकेचा ताबा मिळण्यात अडचण निर्माण झाली होती. परिणामी, आपल्या हक्काच्या घरासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने श्री. गरकळ यांनी १२ ऑक्टोबर, २०२६ रोजी आयोजित २२ व्या लोकशाही दिनात तक्रार दाखल केली.
Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…
या तक्रारीची गंभीर दखल घेत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी सुनावणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना वाढीव शुल्क आकारणीसंदर्भात आवश्यक निर्देश देण्यास सांगितले. तसेच, अर्जदाराला सदनिकेचा ताबा मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही केली आणि श्री. गरकळ यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा मिळाला.
लोकशाही दिन हा केवळ तक्रार मांडण्याचा मंच नसून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी परिणामकारक ठरणारा उपक्रम असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. लोकाभिमुख प्रशासन आणि कालमर्यादेत तक्रार निवारण यांना म्हाडा प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. नागरिकांना केवळ आश्वासने न देता त्यांच्या प्रश्नांचे प्रत्यक्ष निराकरण करून दिलासा देणे, हाच लोकशाही दिनाचा खरा उद्देश आहे. गरकळ यांना मिळालेला सदनिकेचा ताबा हे या उपक्रमाच्या परिणामकारकतेचे उदाहरण ठरले आहे. लोकशाही दिनामुळे नागरिकांना आपली बाजू थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळते, तर संबंधित यंत्रणेला प्रलंबित प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन न्याय्य तोडगा काढता येतो.
जानेवारी-२०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील सभागृहात म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून घ्यावे. आजतागायत म्हाडामध्ये २२ लोकशाही दिन कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकार्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकांप्रती संवेदनशील बनले असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रत्येक लोकशाही दिन कार्यक्रमापूर्वी जयस्वाल यांच्याकडून यापूर्वी झालेल्या लोकशाही दिनातील प्रकरणांवर अधिकार्यांकडून होत असलेल्या कार्यवाहीचा देखील आढावा घेण्यात येतो. यामुळेच तसेच लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा ठरत आहे.
Ans: जानेवारी-२०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील सभागृहात म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.
Ans: लोकशाही दिन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी परिणामकारक ठरणारा उपक्रम असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे.






