'दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन'; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी (संग्रहित फोटो)
उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना सायंकाळी ७.०६ वाजता एक फोन आला. या फोननंतर जंजाळ यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठले; मात्र पोलिसांनी पुरावे आणण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारानंतर संतप्त समर्थकांनी ठाण्यासमोर गर्दी केली. आरोपीला अटक होईपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका जंजाळ यांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत ४०० ते ५०० जणांचा ठिय्या आणि घोषणाबाजी सुरू होती. या घटनेच्या निमित्ताने परिसरातील वाढती गुन्हेगारी, नशेखोरी आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही जंजाळ यांनी प्रश्न उपस्थित केले.
धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पवन जैस्वाल याच्याविरुद्ध १६ ते १७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली असून, दोनदा तडीपारीही झाली आहे, असा दावा जंजाळ यांनी केला. अशा पार्श्वभूमीवर धमकीच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
पुरावे आणा, मग गुन्हा दाखल होईल
धमकीप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिस निरीक्षक मुंडे यांनी पुरावे घेऊन या, त्यानंतरच गुन्हा दाखल होईल, असे सांगितल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
खून, नशेखोरीवरूनही सवाल
दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेत पोलिस दीड तास उशिरा पोहोचल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. मृताच्या नातेवाइकांचीच उलट चौकशी झाल्याचेही ते म्हणाले. आता काही वेळापूर्वी ठाण्यात काही लोक तक्रार घेऊन आले होते. मळ्यात तरुण नशा करतात, त्यांचा बंदोबस्त करा, गस्त वाढवा अशी विनंती त्यांनी पोलिसांनी केली. मात्र, पोलिसांनीच नागरिकांना संबंधित तरुणांचे फोटो काढून आणण्यास सांगितल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
मुंडे आल्यापासून गुन्हे वाढले
पोलिस निरीक्षक मुंडे हे पुंडलिकनगर ठाण्यात आल्यापासून हद्दीत गुन्हेगारी, नशेखोरी आणि खुनाच्या घटनांत वाढ झाल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. आरोपीला अटक होईपर्यंत ठाण्यासमोरील आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
FAQ
नेमके काय घडले? कोणाला धमकी मिळाली?
– छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे उपमहापौर आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची घटना समोर आली.
तक्रार कुठे दाखल झाली? पोलिसांनी काय केले?
– पोलिसांनी धमकी देणाऱ्या नंबरचे CDR आणि लोकेशन ट्रॅकिंग सुरू केले. जंजाळ यांना तात्पुरती पोलीस सुरक्षा वाढवली. पूर्वीही त्यांना रोड टेंडरवरून मारहाण प्रकरणात FIR झाला होता.
कायद्यात काय शिक्षा आहे?
– BNS 308 (पूर्वी IPC 384) – खंडणी: 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास BNS 351(2)(3) – जीवे मारण्याची धमकी : जर धमकीत खंडणी मागितली असेल तर 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (MCOCA) – जर आरोपी सराईत गुन्हेगार असेल तर लागू होऊ शकतो.






