रायगडसह नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर मिटला?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक नेत्यांना मंत्रिपदं मिळाली. बहुतांश जिल्ह्यांत पालकमंत्रिपदाची निवडही झाली. त्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाच्या निवडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. असे असताना आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद काही संपताना दिसून येत नसल्याचे दिसून आले.
हेदेखील वाचा : बंदिबांधवांच्या आयुष्याचा वाचनीय प्रवास सुरु ! तळोजा कारागृहातील वाचनालयाला मिळाली 400 पुस्तकं
एक मे रोजी महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे या रायगडमध्ये झेंडावंदन करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री भरत गोगावले म्हणाले की, ‘झेंडावंदन करता आले म्हणजे पालकमंत्रिपद दिले असे नाही. मागच्या वेळी 15 ऑगस्टला झेंडावंदन दिल्याने यावेळी दिले असेल. वाटतो म्हणून तर चालले आहे, काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात. एकट्यानी नसतात घ्यायच्या.
वाद कायम
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरूच आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचाही वाद
दुसरीकडे, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा ही वाद आहे. तिथे भाजपच्या गिरीश महाजन यांना झेंडावंदन करता येणार आहे. यामुळे तेच नाशिकचे पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महायुतीमधील पालकमंत्रिपदाचा वाद इथे संपणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिकसाठी दादा भुसे इच्छुक
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे दादा भुसे हे इच्छुक होते. महाराष्ट्र दिनी तरी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते त्यांचा जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे महाजन आणि तटकरे यांचेच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहिती आहे.