बंदिबांधवांच्या आयुष्याचा वाचनीय प्रवास सुरु ! तळोजा कारागृहातील वाचनालयाला मिळाली 400 पुस्तकं
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ संचलित प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय व टाऊन लायब्ररी यांच्यावतीने एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत कारागृहातील बंदी बांधवांच्या वाचनालयासाठी 400 पुस्तके भेट म्हणून प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी विशेष उपस्थिती लावून उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. अतिरिक्त अधीक्षक गोविंद राठोड, उपअधीक्षक अतुल काळे व वरिष्ठ तुरुंग अधिकारी राहुल झुटाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत करत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कर्जतमध्ये वीजपुरवठ्याचा गोंधळ कायम; संघर्ष समितीचा तीव्र इशारा
मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी बंदी बांधवांना वाचनाचे महत्त्व समजावले व सकारात्मक विचारसरणी जपण्याचा संदेश दिला. उपाध्यक्ष रविंद्र नेने यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमान कारागृहातील लेखनकथा सांगून प्रेरणा दिली. उपाध्यक्षा प्रा. अश्विनी बाचलकर यांनी वाचनातून होणाऱ्या वैचारिक समृद्धीवर भर देत “ज्ञानदान हाच श्रेष्ठ दान” या संकल्पनेवर भाष्य केले.
मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत पाटील यांनी बंदी बांधवांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात नवी मुंबईतील युवा कवी जितेंद्र लाड व वैभव वऱ्हाडी (रेडिओ,आरजे) यांनी कविता सादर करून उपस्थितांना विचारप्रवृत्त करणारा संदेश दिला. एका बंदी बांधवाने स्वतः लिहिलेली हिंदी कविता सादर करत भावनांना वाट मोकळी करून दिली. तर कारागृह शिपाई नवनाथ सावंत यांनी “आई” या विषयावर भावस्पर्शी कविता सादर केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारागृहातील शिक्षक नामदेव शिंदे यांनी केले.
Temghar Dam: टेमघर धरणातून होणारी पाणीगळती रोखण्यासाठी ४८८ कोटींच्या खर्चाला मान्यता
हा उपक्रम म्हणजे विचारांची देवाण घेवाण घडवून आणणारा एक आशयघन व सृजनशील प्रयत्न ठरला. ग्रंथसंपदेच्या माध्यमातून बंदी बांधवांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.