
मुंबईत प्रदूषित हवेवर 'पावसाचा' दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
दरम्यान शहरातील लालबाग, दादर ते थेट मीरा भाईंदर पर्यंतचा परिसर पावसाच्या प्रभावाखाली होता. काही ठिकाणी पहाटे ५. ३० वाजता पावसाला सुरुवात झाली. ते ६ वाजेपर्यंत बरसत होता. पवई, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, गोरेगाव, विद्याविहार आदी परिसरात सकाळच्या पेपरवाले, दूधवाले, फुलवाले सारख्या फेरीवाल्यांनी प्लास्टिक, रेनकोट, छत्र्यांच्या साहाय्याने आपल्या टपऱ्या सज्ज केल्या. पहिल्या दिवशी मुंबईत पाऊस पडेल, असा अंदाज नव्हता. तर वरळी, दादर, सायन, चेंबूर, वाशी, माहीम अशा अनेक ठिकाणी पावसाने लोकांची त्रेधा उडवली. दरम्यान, मुंबईत नेमक्या ठिकाणीच पाऊस झाला. मात्र त्याच वेळी ठाणे सारखा परिसर कोरडा होता. नेमका मुंबईत अनपेक्षित पाऊस झाला या मागील चार कारणे हवामान अभ्यासक अंकुर पुराणिक यांनी स्पष्ट केली.
१)पश्चिमी वाऱ्यांचे सक्रिय होणे :
अरबी समुद्राकडून येणारे ओलसर पश्चिमी वारे कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरात सक्रिय झाल्याने वातावरणातील आर्द्रता वाढली.
२)खालच्या स्तरातील जास्त आर्द्रता:
समुद्रातून आलेल्या दमट हवेने खालच्या स्तरात ढगनिर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण केली.
३)तापमानातील तफावत:
रात्री-पहाटेच्या सुमारास समुद्र व जमिनीतील तापमानातील फरकामुळे ढगांची उंची वाढून पर्जन्य ढग तयार झाले.
४)स्थानिक ढगनिर्मिती:
कोणतीही तीव्र हवामान प्रणाली नसतानाही स्थानिक पातळीवर तयार झालेल्या क्युम्युलस व क्युम्युलोनिंबस ढगांमुळे अचानक पावसाच्या सरी कोसळल्या.
जानेवारी महिन्यात मुंबईत पाऊस पडणे दुर्मीळ असले, तरी समुद्रालगतच्या आर्द्रतेमुळे अशा स्वरूपाच्या हलक्या सरी कधीकधी पडू शकतात, अशी माहिती हवामानशास्त्र अभ्यासक अंकुर पुराणिक यांनी दिली आहे.