२०२५ च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी
या लांबलेल्या पावसाचा परिणाम केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो आणि पायाभूत सुविधा कामांवर झाला. निचरा व्यवस्था ठराविक कालावधीतील पावसाचा विचार करून उभारलेली असल्याने ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिलेल्या सरींनी तिच्या मर्यादा उघड केल्या. काही भागांत पाणी उपसण्यासाठी पंप सुरू ठेवण्याची वेळ सप्टेंबरनंतरही आली.
मुंबईबरोबरच कोकण पट्ट्यातही पावसाचा कालावधी वाढलेला दिसला, पश्चिम महाराष्ट्रात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची काढणी रखडली, तर मराठवाड्यात काही भागांत हा पाऊस दिलासादायक ठरला. मात्र सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या पिकांना लांबलेल्या पावसाचा फटका बसल्याचे चित्रही दिसले. म्हणजेच, पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी त्याची वेळ बदलल्याने शेती व्यवस्थेवर नवे आव्हान उभे राहिले. हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२५ मधील लांबलेला पाऊस हा अपवाद नसून बदलत्या हवामान पद्धतींचा संकेत आहे, अरबी समुद्रातील वाढलेले तापमान, कमी दाबाचे क्षेत्र आणि वारंवार सक्रिय होणाऱ्या हवामान प्रणाली यामुळे पावसाचा कालावधी वाढत असल्याचे निरीक्षण नौदवले जात आहे. त्यामुळे मान्सून कची येतो आणि कची जाती’ या पारंपरिक चौकटी आता पुरेशा ठरत नाहीत.
या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरासाठी दीर्घकालीन नियोजनाचा पुनर्विचार अपरिहार्य ठरतो. निचरा व्यवस्था, पूर नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि बांधकाम नियोजन हे सर्व घटक लांबलेल्या पावसाचा विचार करून अद्ययावत करणे आवश्यक आहे, अन्यथा दरवर्षी मान्सूननंतरही शहर पावसाशी झुंज देत राहील.
एकूणच, २०२५ मधील मान्सूनने मुंबईला एक स्पष्ट इशारा दिला आहे. पाऊस आता केवळ किती पडलो. यावर नाही तर तो किती काळ टिकतो, यावर शहराचे भवितव्य ठरणार आहे. लांबलेला पाऊस हीच बदलत्या हवामानाची नवी ओळख ठरत असताना त्यानुसार धोरणात्मक पावले उचलली गेली, तरच मुंबई पुढील आव्हानांसाठी सज्ज होऊ शकेल.






