Pune Weather : पुणे शहरातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती; पुढील तीन दिवस हवामान...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात मागील काही दिवसांपासून जाणवणारा गारठा आता काहीसा कमी होऊ लागला आहे. शनिवारी किमान तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात आली असून, पुढील तीन दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर मात्र किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत पुणे आणि परिसरात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारठा जाणवत होता. शनिवारी किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर निरभ्र आकाश व कोरडे वातावरण असल्याने हलका गारवा कायम होता. रविवारीही तापमान साधारण याच पातळीवर राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळी विरळ धुक्याची शक्यता असून मंगळवारपासून कमाल व किमान तापमानात थोडी वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हेदेखील वाचा : Pune Municipal Election 2026: रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत? पुण्यात घडामोडींना वेग
दरम्यान, पुण्यात यंदा हुडहुडी वाढली असून. डिसेंबर महिन्याने थंडीचे गेल्या १० वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. डिसेंबरच्या अवघ्या २३ दिवसांतच तब्बल १३ दिवस किमान तापमानाची नोंद ‘एक’ अंकी झाली आहे. गेल्या १० वर्षांतील हा एक विक्रम ठरला आहे. २०१४ पासूनची आकडेवारी पाहता यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
पुण्यात पहाटेच्या वेळी वाढतोय गारठा
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पहाटेच्या वेळी गारठा वाढला आहे. दिवसभर निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे रात्रीच्या वेळी थंडीचा प्रभाव वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. याविषयी भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे वैज्ञानिक ‘डी’ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, ‘सध्या पुणे आणि परिसरातील हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण कमालीचे घटले आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गारवा अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. तसेच दिवसभर आकाश पूर्णपणे निरभ्र राहत असल्याने सूर्याची उष्णता रात्री वेगाने उत्सर्जित होते आणि पहाटेच्या किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळते. यामुळेच यंदा डिसेंबरमध्ये गेल्या दशकातील सर्वाधिक एक अंकी तापमानाचे दिवस नोंदवले गेले आहेत.
हेदेखील वाचा : यंदा सगळं काही जास्तच! पुणेकर थंडीने गारठले; डिसेंबरने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, २३ दिवसांतच…






