जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण
शहरातील सर्वात श्रीमंत जीएसबी गणेश सेवा मंडळ सध्या सर्व विक्रम मोडीत काढण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा (GSB Ganeshotsav 2026) मंडळाच्या ‘महागणपती’च्या आगमनाचे यंदा ७२ वे वर्ष साजरे केले जाणार आहे. ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ अशी भाविकांमध्ये श्रद्धा असलेल्या या महागणपतीच्या गणेशोत्सवाची (GSB Ganeshotsav 2026) तयारी जोरात सुरू आहे. यंदाच्या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाने तब्बल ७०३.२७ कोटी रुपयांचे गणेशोत्सव विमा संरक्षण घेतले आहे.
नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा
जीएसबी सेवा मंडळाने घेतलेल्या विमा संरक्षणामध्ये गणेशोत्सवाचा मंडप, महागणपतीची मूर्ती, सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाधारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षेलाही विमा संरक्षण देण्यात आले आहे. लाखो भाविक उत्सवात सहभागी होत असल्याने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
जीएसबीच्या महागणपतीचा दागिन्यांचा थाटही यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे. जीएसबीच्या या महागणपतीला ६६ किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३३५ किलोहून अधिक चांदी, तसेच विविध मौल्यवान रत्नांनी सजविण्यात येणार आहे. हे दागिने आणि मौल्यवान वस्तू प्रामुख्याने भाविक व सेवाधाऱ्यांकडून देणगी स्वरूपात प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
महागणपतीचा ‘विराट दर्शन’ सोहळा १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर १४ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. धार्मिक परंपरा आणि वैदिक पद्धती जपत उत्सवातील सर्व विधी पार पडणार आहेत.
जीएसबीच्या मंडपात सरासरी एक लाखांहून अधिक भाविक आणि सेवाधारी महागणपतीला पूजा व सेवा अर्पण करतात. पूजा, अर्चना, सेवा, अन्नदान, तुलाभार आणि गणहोम यांसारखे धार्मिक विधी शास्त्रोक्त आणि वैदिक परंपरेनुसार केले जातात.
अन्नदान हे या गणेशोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. दररोज ४० हजारांहून अधिक, तर पाच दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविक अन्नदान सेवेचा लाभ घेतात. विशेष म्हणजे भाविकांना पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर प्रसाद दिला जातो.
पर्यावरण संरक्षणासाठी जीएसबी सेवा मंडळाने यंदाही ‘गो ग्रीन’ उपक्रमावर भर दिला आहे. मंडळाने पारंपरिक छापील पावत्यांऐवजी डिजिटल पद्धतीचा स्वीकार केला असून त्यामुळे कागदाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागणपतीची मूर्तीही पर्यावरणपूरक असून गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.






