
राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून, १७ सप्टेंबरदरम्यान विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो विदर्भातून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकणाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. विदर्भात 11 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात झाली असून, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अकोला, बुलढाणा, अमरावतीसह अन्य जिल्ह्यांतही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढू शकतो.
दरम्यान, नागपूर शहर आणि परिसरात शनिवारी (दि.12) विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी दुपारपर्यंत आकाश निरभ्र होते. दुपारी दोननंतर ढग जमा झाले. त्यानंतर काही मिनिटांतच पावसाने हजेरी लावली. पहिले काही तास पावसाने चांगलाच जोर धरला. त्यानंतर सायंकाळपर्यंत रिमझिम हजेरी सुरू होती. रात्री २ अंशाने जास्त होते. किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात हलका ते मध्यम, तसेच जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.