
पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह...
पुणे : सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ऑगस्ट महिन्यातही पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने पुढील दोन दिवस राज्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी (दि.12) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे शुक्रवारी (दि.11) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत सर्वाधिक ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पावसाने ओढ कायम असून, कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. चंद्रपूर येथे शुक्रवारी (ता.11) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून, राजस्थानच्या श्रीगंगानगरपासून, चुरू, शिवपुरी, दामोह, बिलासपूर, कमी दाबाचे केंद्र, ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
दरम्यान, उत्तर राजस्थानपासून कमी दाबाचे केंद्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकपासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. शनिवारी (दि.12) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात हलका ते मध्यम, तसेच जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.
नांदेड, हिंगोलीलाही यलो अलर्ट
लातूर, जालना, बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तसेच काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलका, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे.