
Ravindra Chavan
मुंबई, ८ ऑक्टोबर २०२६ : कल्याण-डोंबिवली परिसरातील रेल्वे प्रवाशांना रोजच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गर्दीच्या वेळेत लोकल पकडताना होणारी धावपळ, गाड्यांना होणारा उशीर आणि सुरक्षिततेचे प्रश्न हे मुंबईकरांसाठी रोजच्या समस्या झाल्या आहेत. या समस्या लक्षात घेता त्या सोडवण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक (डीआरएम) हिरेश मीना यांच्यासोबत मुंबईतील सीएसटी येथील मध्य रेल्वे मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. (Kalyan-Dombivli News)
२६ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि विविध मागण्या मांडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनासोबत ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत निळजे रेल्वे स्थानकातून गर्दीच्या वेळेत मुंबईच्या दिशेने दर तासाला लोकल सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. या सेवेमुळे परिसरातील प्रवाशांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, ही सेवा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर होणे बाकी आहे.
डोंबिवली आणि दिवा रेल्वे स्थानकांतून गर्दीच्या वेळेत थेट मुंबईकडे लोकल सुरू करण्याची मागणीही या बैठकीत मांडण्यात आली. या भागातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकलमध्ये होणारी कोंडी कमी करण्यासाठी अतिरिक्त किंवा अधिक सोयीच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.
याशिवाय, प्रवाश्याना भेडसावणाऱ्या रोजच्या समस्या म्हणजेच लोकल गाड्यांना होणारा उशीर, प्रवाशांची सुरक्षा आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन या मुद्द्यांवरही चर्चा झाली. प्रवाशांना भेडसावणाऱ्या या अडचणींवर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी रविंद्र चव्हाण यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी या मागण्या महत्त्वाच्या आहेत. विशेषतः निळजे स्थानकातून नियमित लोकल सेवा आणि डोंबिवली-दिवा स्थानकांतून थेट मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची उपलब्धता वाढल्यास गर्दीच्या वेळेतील प्रवास अधिक सोयीचा होण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीला लोढा पलावा येथील कासा रियो आणि कासा रियो गोल्ड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीज फेडरेशनच्या वतीने सतीश सिंग उपस्थित होते. आता रेल्वे प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे परिसरातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.