कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल
११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे आणि २० ऑक्टोबरला दसरा आहे. यादरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात येणार आहे. हे नियम ११ ऑक्टोबरपासून २० ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील, याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दसऱ्याच्या काळात कल्याण शहरात होणारी संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खबरदारीची पावले उचलली आहेत. कल्याण पश्चिमेकडील दुर्गामाता मंदिर आणि ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सात प्रमुख मार्गांवर जड, अवजड आणि मल्टिएक्सल वाहनांसह खासगी व सरकारी बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी ५ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. या निर्बंधांमधून पोलिस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांतील वाहनांना वगळण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवी मुंबई, पनवेल, महापे पाईपलाईन व मुंब्रा येथून पत्रीपूलमार्गे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी. ही वाहने मुंब्रा बायपास खारेगाव टोलनाका मुंबई-नाशिक महामार्गाने वळवण्यात येतील.
तळोजा बायपासमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना रोखले जाईल. या वाहनांना बदलापूर-अंबरनाथ – काटई-बदलापूर चौक लोढा पलावा फाटामार्गे जाता येईल.
मलंग रोडमार्गे चक्कीनाका-पत्रीपूलकडे येणाऱ्या जड वाहनांना मनाई असेल. ही वाहने बदलापूर-अंबरनाथ महामार्गाने इच्छितस्थळी जातील.
कोळसेवाडी हद्दीत जाणाऱ्या वाहनांना बंदी असून उल्हासनगर शहाड अंबरनाथ मार्गाचा वापर करावा लागेल.
शहाड, प्रेम ऑटो, दुर्गामाता चौक, कोनगाव व भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी. पर्याय म्हणून आधारवाडी चौक-गंधारी ब्रिज बापगाव सोनाळे मार्गाचा वापर करावा.
कोनगावमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना बंदी असून ही वाहतूक मुंबई-नाशिक महामार्ग खारेगाव टोलनाका मार्गे वळवली जाईल.
ठाणे ग्रामीण हद्दीतून बापगावमार्गे गंधारी ब्रिजकडून येणाऱ्या वाहनांना मज्जाव असेल; या वाहनांना सावदनाका सोनाळे मार्गाने पुढे पाठवले जाईल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






