मालाड खोत डोंगरी एसआरए प्रकल्प: २० वर्षांच्या रखडपट्टीने नागरिक संतप्त, शाह हाऊसकॉनला हटवण्याची मागणी
मुंबईतील मालाड येथील खोत डोंगरी परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास योजना (SRA) गेल्या २० वर्षांपासून रखडली असून, यामुळे पात्र रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एसआरएच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाह हाऊसकॉन या विकासकाची प्रकल्पातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे. एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत नुकत्याच पार पडलेल्या विशेष बैठकीत नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावर येत्या पाच दिवसांत प्रश्न न सुटल्यास विकासकावर निष्कासनाची कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली आहे.
वर्षानुवर्षे थकीत असलेले घरांचे भाडे, बांधकामाची संथ गती आणि विकासकाकडून होणारा अक्षम्य विलंब यामुळे नागरिक आर्थिक व मानसिकदृष्ट्या मेटाकुटीला आले आहेत. बैठकीदरम्यान एका ज्येष्ठ रहिवाशाने सांगितले की, हक्काच्या घराच्या आशेने रहिवाशांनी आपली घरे मोडून विकासकाच्या हाती सोपवली होती. मात्र, अनेक वर्षे मन्सुख शाह यांनी केवळ आश्वासने दिली असून प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम केलेले नाही. तसेच, घराचे भाडेही वेळेवर मिळत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी प्राधिकरणासमोर व्यक्त करत विकासकाला तात्काळ हटवण्याची मागणी केली.
पात्र भाडेकरूंचे भाडे अनेक महिन्यांपासून थकवणे, घराचा ताबा देण्यासाठी पैशांची मागणी करणे, पुनर्वसन इमारतींमधील घरे बेकायदेशीरपणे बाहेरील व्यक्तींना विकणे आणि गुंडांकरवी सामान्य रहिवाशांना धमकावणे असे अनेक गंभीर आरोप रहिवाशांनी आपल्या तक्रारीत केले आहेत.

