
आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; 'तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,' परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. 19 सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी जरांगेंनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. आंदोलना दरम्यान पोलिसांनी घातलेल्या अटी-शर्तींचं पालन करू, असं हमीपत्रही त्यांनी दिलं होतं.
मात्र, आझाद मैदान पोलिसांनी गेल्या वर्षीच्या आंदोलनातील नियम-अटींच्या कथित उल्लंघनाचा दाखला देत परवानगी नाकारली आहे. यामुळे आता जरांगे विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “आम्ही संविधानाप्रमाणे चालतो. न्यायालयाच्या चौकटीत राहून आंदोलन करू. सरकारचे आडमुठे नियम आम्हाला मान्य नाहीत,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
गेल्या वर्षीही गणेशोत्सव होता, मग त्यावेळी आंदोलनाला परवानगी कशी मिळाली? असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला. यावेळीही न्यायालयाने घातलेल्या अटी-शर्तींचं पालन करून शांततेत आंदोलन करण्याचा आमचा निर्धार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
परवानगी नाकारण्याच्या निर्णयावरून जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. सरकार कायदा आपल्या सोयीनुसार चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात अराजकता आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला.
“मी शरण येणार नाही, तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही. ठामपणे उभं राहून मरण पत्करेन; पण सरकारसमोर झुकणार नाही,” अशा आक्रमक शब्दांत जरांगेंनी आपली भूमिका मांडली. तसंच, सरकारने आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला तर आपण 15 तारखेला मुंबईकडे निघणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या मागण्यांसाठी पुढची कायदेशीर लढाई वकील लढतील, असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका आणखी आक्रमक केली आहे. सरकारने अन्याय केल्याचा आरोप करत त्यांनी पाणी, सलाईन आणि उपचार बंद करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, परवानगी नाकारण्याच्या निर्णयाविरोधात पुढे कायदेशीर मार्गाने दाद मागायची, पोलीस आयुक्तांकडे जायचं की अन्य पर्याय स्वीकारायचा, याचा निर्णय वकील घेतील, असं जरांगेंनी सांगितलं. त्यामुळे आता 19 सप्टेंबरच्या आंदोलनाबाबत जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.