
‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,' मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस - शिंदे यांच्यावर निशाणा
Maratha Reservation : मुंबईतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीतून केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गंभीर आरोप करत, आपल्या मुंबईतील मोर्चात गोंधळ घालून आपल्याला लक्ष्य करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा जरांगे यांनी केला.
मोर्चात शिंदे आणि भाजपचीच काही माणसं घुसवून गोंधळ घातला जाऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला. एवढंच नाही तर मोर्चात गोळ्या झाडण्याचा डाव असल्याचंही जरांगे म्हणाले. “मराठ्यांना न मारता फक्त मला शूट करणार आहेत,” असा दावा करत त्यांनी या सगळ्यामुळे आपण मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं.
19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचून सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. उपोषणासाठी परवानगी मागण्यात आली असून, कायद्याचं पालन करूनच मुंबईत जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “माझी काय चूक, मी कायद्याचे उल्लंघन करत आहे का?” असा सवालही त्यांनी सरकारला केला.
यावेळी त्यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहनही केलं. आपल्याला साथ द्यायची नसेल किंवा भीती वाटत असेल तर घरात बसा; मात्र मुंबईला जाताना साथ द्या आणि त्यानंतर आपल्या अंत्ययात्रेला या, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाष्य केलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जरांगे यांनी निशाणा साधला. तसेच “मरण पत्कारेन, पण तुम्हाला शरण येणार नाही,” असा थेट इशारा देत त्यांनी चौकशा किंवा दबावामुळे आंदोलन मागे घेणार नसल्याचं सांगितलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावरही जरांगे यांनी सवाल उपस्थित केला. यापूर्वी शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून वाशीमधून जीआर घेऊन आलो होतो, असं सांगत त्यांनी आता सरकारची भूमिका काय आहे, असा सवाल केला.
मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. त्यांच्या दाव्यांवर सरकार आणि संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Manoj Jarange Patil : ‘जरांगे भंपक माणूस, ऑस्करसाठी नामांकन पाठवा’; अजय बारसकरांची घणाघाती टीका