छट पूजेदरम्यान मुंबई महापालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध
मेट्रो आणि बेस्ट सेवा उशिरापर्यंत सुरु राहणार
छट पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पार पडली बैठक
मुंबई: मुंबई परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून, यादरम्यान महापालिकेकडून विविध सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच उत्सवादरम्यान शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. महापालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी छट पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई परिसरात २७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजऱ्या होणाऱ्या छट पूजेदरम्यान भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उपायुक्त प्रशांत सकपाळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतकुमार दहिया, उत्तर भारतीय जनता परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांच्यासह छट पूजा उत्सव समित्यांचे ५५ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी समितीच्या सूचनांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. त्यानुसार मुंबईतील पूजा स्थळे निश्चित करून, त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्रकाश झोत, पूजेसाठी टेबल, वाहतूक नियंत्रण, शौचालये आणि महिला भाविकांना पूजेनंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालिकेचे उपायुक्त प्रशांत सकपाळे यांनी दिली. शहर आणि उपनगरातील एकूण ४० पूजा स्थळे निश्चित करण्यात आली असून, मागणीनुसार हा आकडा ६० पूजा स्थळापर्यंत वाढणार आहे.
Mangal Prabhat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा
राज्यातील सण आणि उत्सव जल्लोषात साजरे व्हावेत,भाविकांना आवश्यक त्या सुविधा प्रशासनाने पुरवाव्यात यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी आग्रही असतात, याच अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या की, छट पूजा उत्सवाच्या काळात भाविकांच्या सुविधेसाठी शहरातील वाहतूक सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवावी. त्यानुसार मेट्रो, बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यासंदर्भात पालिकेकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आणखी काही छट पूजा मंडळांना पूजा स्थळांची परवानगी हवी असल्यास तत्काळ एक खिडकी योजना सुरु करून मंडळांना परवानगी द्यावी आणि ही परवानगी गणेशोत्सवाप्रमाणेच पुढील पाच वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात यावी, अश्या सूचना मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी केल्या असून, त्यालाही अधिकाऱ्यांनी यावेळी मान्यता दिली.
मुंबई परिसरात रात्री उशिरा छटपूजेकरिता मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात, अशावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी छट पूजा समित्यांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार सर्व पूजा स्थळांवर चोख पोलीस बंदोबस्त यासह सुरक्षेकरिता सीसी टीव्ही बसवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतकुमार दहिया यांनी स्पष्ट केले. एकूणच सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही केल्याबाबत छट पूजा समितीच्या प्रतिनिधींनी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांचे आभार व्यक्त केले आहेत.