धनंजय मुंडे यांना द्यावा लागणार मंत्रिपदाचा राजीनामा; स्वत: मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याची माहिती
मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे नागरी व अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांना सोमवारीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती आता दिली जात आहे. त्यामुळे आता मुंडे राजीनामा देतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी (दि.3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. सोमवारी धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधान परिषदेचे कामकाज संपल्यानंतर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सुमारे 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा नेमका तपशील समोर आलेला नाही. या भेटीचे नेमके कारण समोर आले नसले तरी, या बैठकीत मुंडेंनी राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, मी 5 मार्चपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात उपोषणाला बसणार होते. पण सूत्रांनी मला माहिती दिली की, दोन दिवस आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे. त्यांच्या मते, धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते. मात्र, अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि तो अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर केला जाईल, असे सांगण्यात येत होते, असे करुणा मुंडे यांनी सांगितले. यासंदर्भात धनंजय मुंडे किंवा महायुती सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वाढता राजकीय दबाव आणि या चर्चांच्या पार्श्वभूमीवर लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा आधीच घेतला?
धनंजय मुंडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजीनामा देतील. इतकेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा आधीच घेतला आहे, असाही मोठा दावा त्यांनी केला होता. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell’s Palsy) हा आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांना सलग बोलताना अडचण येत आहे.