बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
साबरमती येथील रोलिंग स्टॉक डेपोमध्ये हलकी तसेच मोठी देखभाल करण्याची सुविधा असेल. आपत्कालीन दुरुस्ती, चाकांचे री-प्रोफाइलिंग, कोचच्या बॉडीची दुरुस्ती, उपकरणे आणि बोगींसाठी स्वतंत्र कार्यशाळा, नियमित तपासणी, तपासणी शेड तसेच ट्रेन धुलाई संयंत्र उभारण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
साबरमती डेपोमध्ये सुरुवातीला चार तपासणी मार्गिका आणि १० स्टेबलिंग मार्गिका असतील. प्रवासी सेवा वाढल्यानंतर तपासणी मार्गिकांची संख्या आठ, तर स्टेबलिंग मार्गिकांची संख्या २९ पर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. १६ डब्यांच्या ट्रेनसेटच्या अनुषंगाने डेपोची रचना करण्यात आली आहे. बोगी बदलणे, तपासणी आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र सुविधाही उपलब्ध असतील.
डेपोमध्ये अपशिष्ट व सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, कचरा व्यवस्थापन व्यवस्था तसेच भूजल पुनर्भरणाची सुविधा उभारण्यात येणार आहे. डेपोच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी चार जलाशयांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
सुरत डेपो हा साबरमती आणि ठाणे डेपोंसोबत समन्वय साधून अतिरिक्त देखभाल क्षमता उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे एका डेपोवर देखभालीचा अतिरिक्त भार येणार नाही. तसेच मार्गाच्या वेगवेगळ्या भागांजवळच गाड्यांची देखभाल करता येणार असल्याने वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या तीनही डेपोंमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि भारतात प्रथमच वापरल्या जाणाऱ्या काही प्रणालींचा समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या सुरक्षित आणि सुरळीत संचालनासाठी आवश्यक देखभाल व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.