वाहतूक कोंडीने घेतला 2 वर्षीय चिमुकल्याचा जीव! रुग्णवाहिका 5 तास थांबली अन् बाळाने आईच्या कुशीत जीव सोडला
भाईंदर, विजय काते : वसई परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. फक्त १ वर्ष ८ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव वाहतुकीच्या कोंडीत अडकून गेला. हा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर महामार्गावरील निष्काळजीपणा, अव्यवस्था आणि जबाबदारीच्या अभावामुळे झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
मुंबईला उपचारासाठी नेता-नेता वाहतूक कोंडीनं त्याचा जीव घेतला. गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या दीड वर्षांच्या चिमुकल्याला डॉक्टरांनी तातडीच्या उपचारांसाठी मुंबईत घेऊन जा असं सांगितलं. कुटुंबियांनी लगबग करुन रुग्णवाहिकेतून चिमुकल्याला घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले, मात्र नशीबानं साथ दिली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला सुमारे १५ फुटांवरून खाली पडला होता. अपघातानंतर तो शुद्धीत होता आणि कुटुंबीयांनी तातडीने त्याला वसईतील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करताच मुलाची अवस्था गंभीर असल्याने तातडीने सीटी स्कॅनची गरज असल्याचे सांगितले. परंतु उपचार मिळण्याआधीच मुंबई-अहमदाबाद महामार्ग (एनएच-४८) व घाटकोपर रोडवरील प्रचंड ट्रॅफिक जाम हे त्या मुलाच्या मृत्यूचे कारण ठरले. जे अंतर केवळ २०-३० मिनिटांत पार व्हायला हवे होते, ते ४-५ तासांच्या भीषण कोंडीत अडकले.
मुलाची प्रकृती झपाट्याने बिघडत असताना, त्याचा काका आर्त विनवण्या करत मुलाला हातात घेऊन रिक्षातून उतरून धावत होता. वाहनचालकांकडून मदतीची याचना करत होता. अखेर एका अनोळखी दुचाकीस्वाराने मदतीचा हात दिला आणि मुलाला जवळच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही मुलाला वाचवता आले नाही.
या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की, महामार्गावर दिवसा बंदी असूनही जड वाहनं का धावत होती? ट्रॅफिक नियंत्रण यंत्रणा नेमकी कुठे होती? जीव वाचवण्याच्या शर्यतीत तासन् तास अडकवून ठेवणाऱ्या या प्रणालीला जबाबदार कोण धरणार?
धक्कादायक म्हणजे, अजून महिनाही उलटलेला नाही आणि याच एनएच-४८ वर छाया पुरव यांचा मृत्यूही अॅम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकून झाला होता. एका मागोमाग घडणाऱ्या या शोकांतिकांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण वसई परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी महामार्गावरील वाहतूक नियोजनातील त्रुटी, देखभाल दुरुस्तीतील अक्षम्य हलगर्जीपणा आणि आपत्कालीन सेवांमध्ये रुग्णवाहिकांना दिले जाणारे कमी प्राधान्य यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या या महामार्गावर प्रशासनाची कोणतीही ठोस कृती दिसून आली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.