ठाणे/स्नेहा जाधव काकडे: मुंबईहून अहमदाबाद जाताना घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही वाहतूक कोंडी आता प्रवाशांसाठी आणि स्थानिकांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. गेले कित्येक दिवस या वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळलेल्या स्थानिकांना आणि प्रवाशांना आता यातून दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे. सततच्या या वाहतूक कोंडीबाबत आता उपमुख्य़मंत्र्य़ांनी यावर तोडगा काढला असून समस्येबाबत काही आदेश जिल्हाप्रशासनाला दिले आहेत.
घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत परिसरात राहणाऱ्या रहिवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा सर्व यंत्रणांची बैठक घेवून घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजलेनंतरच जड वाहने सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले. दरम्यान रात्री बारापूर्वी वाहने सोडणाऱ्या आणि वेळेच बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले.
घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीमुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे. त्यांची या त्रासातून मुक्तता करणे हे अतिशय महत्वाचे असून घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या. त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याचे नियोजन करण्यासही सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॅा. श्रीकृष्ण पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलिस आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक, मीरा भाईंदर पोलिस आयुक्त, मीरा भायंदर महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी जेएनपीटीकडून घोडबंदर रस्त्यावर येणारी वाहने रात्री 12 नंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या तसेच याबाबत नियोजन करण्याबाबत नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्तांशी चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर मीरा भाईंदरचे पोलिस आयुक्त , मीरा भाईंदर महापालिका आयुक्त , पालघर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील सल्लामसलत करुन अहमदाबादकडून घोडबंदर रोडकडे येणारी वाहनेही रात्री १२ वाजल्य़ानंतर सोडण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याबरोबर या जड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी या ठिकाणी पार्किगची व्यवस्था करून जड वाहनांचे नियोजन करावे असे सांगितले.
या सर्व यंत्रणाच्या समन्वयाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यावर सोपविली असून यामध्ये वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त , वाहतूक पोलिस शाखेचे उप आयुक्आ णि जस्टीस फॅार घोडबंदर रोडचे पंकज सिन्हा, गिरीष पाटील ही मंडळी उपस्थित होती.