सावन वैश्य | नवी मुंबई : शहरात बेकायदा ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या टोळीला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहेत.सर्वासामान्य वस्तीत अंमली पदार्थांचं रॅकेट उघड झाल्याते परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घणसोली स्टेशन परिसरात एक इसम, अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ दोन पथके तयार करून दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडून पोलिसांनी 72 लाख रुपये किमतीचे एमडी नामक ड्रग्स हस्तगत केले आहे.
नशा मुक्त नवी मुंबई या अभियानाअंतर्गत, नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाचे नवी मुंबईतून समूळ उच्चाटन करण्यासाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी नेरूळ पोलिसांनी जवळपास साडे दहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. तसेच या अमली पदार्थांची विक्री, तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर मकोका गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करून, अशा गुन्हेगारांच्या या प्रवृत्तीच्या नांग्या ठेचायला सुरुवात केली आहे. अशातच आता कोपरखैरणे पोलिसांनी घणसोली रेल्वे स्टेशन परिसरातून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून तब्बल 72 लाख रुपयांचे एमडी नामक ड्रग्ज हस्तगत केले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, निखिल वाघमारे नावाचा इसम घणसोली स्टेशन परिसरात एमडी नामक अमली पदार्थाची विक्रीसाठी येणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कोपरखैरणे पोलिसांनी तात्काळ दोन पथके स्थापन करून, मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावर सापळा लावला, व त्या ठिकाणावरील संशयास्पद हालचाली असणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांची अंग झडती घेतली असता, निखिल राजकुमार वागसे, वय 32 वर्ष, राहणार डोंबिवली, याच्या जवळून 44 लाख रुपये किमतीचे, तर मसूद अब्दुल सलाम खान, वय 40 वर्ष, राहणार कौसा मुंब्रा, याच्या जवळून 28 लाख रुपये किंमतीचे, असे एकूण 72 लाखांचे अमली पदार्थ दोन्ही पथकाने छापा टाकून हस्तगत केले आहेत. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन, असा एकूण 85 लाख 50 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल कोपरखैरणे पोलिसांनी हस्तगत केला आहे.