
अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या...
यापूर्वी 1 फेब्रुवारी 2025 रोजी रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती. आता खटुआ समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार पुन्हा भाडेवाढ करण्यात येणार आहे. टॅक्सीचे प्रतिकिलोमीटर भाडे सध्याच्या 20.66 रुपयांवरून 21.90 रुपये होणार आहे. त्यानुसार पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी किमान भाडे 33 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित
रिक्षाच्या प्रतिकिलोमीटर भाड्यातही वाढ करण्यात येणार आहे. सध्या प्रतिकिलोमीटर 17.14 रुपये आकारले जात असून ते वाढून 18.22 रुपये होणार आहे. पहिल्या 1.5 किलोमीटरच्या भाड्यात प्रत्यक्षात 1.08 रुपयांची वाढ अपेक्षित होती. ही रक्कम पूर्णांकात निश्चित केल्यामुळे रिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये होणार आहे.
खटुआ समितीच्या सूत्रानुसार रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे निश्चित करताना अनेक घटकांचा विचार केला जातो. त्यामध्ये इंधनाच्या किमती, वाहन खरेदीची किंमत, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI), वाहन कर्जावरील व्याजदर आणि सरकारी कर यांचा समावेश आहे. मागील भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात सुमारे 10.25 टक्के म्हणजेच जवळपास 8 रुपयांची वाढ झाल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात होती.
मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने टॅक्सीचे प्रतिकिलोमीटर भाडे 20.66 रुपयांवरून थेट 25 रुपये करण्याची मागणी केली होती. त्यानुसार किमान भाड्यात चार रुपयांची वाढ अपेक्षित होती. मात्र, सरकारने किमान भाड्यात दोन रुपयांची वाढ मंजूर केली आहे. रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीचे स्वागत केले असले तरी ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याची प्रतिक्रिया काही संघटनांनी दिली आहे. ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक शरद राव यांच्या म्हणण्यानुसार टॅक्सीच्या किमान भाड्यात चार रुपये, तर रिक्षाच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ अपेक्षित होती.
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबरोबरच राज्यातील वाहनधारकांसाठी आणखी एक महत्त्वाचा बदल झाला आहे. राज्यात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात PUC तपासणीचे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य PUC सेंटर ओनर्स असोसिएशनने शुल्कवाढीची मागणी केली होती. त्यानंतर परिवहन विभागाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने विविध राज्यांमधील PUC शुल्क, नियम आणि तपासणी प्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर दरांमध्ये सुधारणा करण्यात आली. एकीकडे रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढणार असताना दुसरीकडे PUC तपासणी शुल्कातही वाढ झाल्याने प्रवासी आणि वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे.