
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल सेवांवर होणार परिणाम (फोटो सौजन्य-X)
Mega Block on Central Railway News in Marathi : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, २६ ऑक्टोबर रोजी माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
मध्य मार्गावरील माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान धावणारी जलद लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील लोकल 15 मिनिटे विलंबाने धावण्याची शक्यता आहे. तसेच ठाण्यानंतर या गाड्या पुन्हा फास्ट लाईनवर धावतील. तसेच ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट गाड्याही मुलुंडपासून माटुंगापर्यंत स्लो लाईनवर धावतील आणि त्या देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाणे – वाशी / नेरुळ (ट्रान्स हार्बर लाईन): सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे बंद राहील.
ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या आणि पनवेलकडून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रवाशांनी रेल्वेच्या या बदलांचा विचार करून बाहेर पडण्याचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
तसेच पश्चिम रेल्वेवर वसई रोड – भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 1.15 ते पहाटे 4.45 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबरपर्यंत मुंबई लोकल ट्रेनमधील लाखो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कारण मध्य रेल्वेने कर्जत यार्डमध्ये रिमॉडेलिंगच्या कामासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा केली आहे. २४ आणि २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:२० ते दुपारी १:२० पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. तसेच २५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:२० ते दुपारी ३:४५ पर्यंत असेल. नागनाथ केबिन-कर्जत हा बाधित विभाग असेल.
या काळात कर्जत आणि खोपोली दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहतील. २४, २५, २८ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२५ रोजी काही लोकल ट्रेन रद्द केल्या जातील.
कर्जत-खोपोली येथून दुपारी १२:०० आणि १:१५ वाजता सुटणाऱ्या कर्जत-खोपोली लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, खोपोलीहून सकाळी ११:२० आणि दुपारी १२:४० वाजता सुटणाऱ्या खोपोली-कर्जत लोकल गाड्या देखील या तारखांना रद्द केल्या जातील.
रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ब्लॉकच्या इतर दिवशी उपनगरीय लोकल गाड्या रद्द केल्या जाणार नाहीत. “पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी आणि देखभालीसाठी हे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती आहे,” असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.