‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट!
‘ॲक्वा लाईन’ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सप्टेंबर २०२६ मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज सरासरी २,२४,६०२ प्रवाशांनी, तर शनिवार आणि रविवार या दिवशी दररोज सरासरी १,३१,१३८ प्रवाशांनी ‘ॲक्वा लाईन’ने प्रवास केला. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील ‘अॅक्वा लाईन’चे वाढते महत्त्व यावरून स्पष्ट होते. या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या निमित्ताने MMRC तर्फे ‘ॲक्वा लाईन time capsule आणि ‘ॲक्वा लाईन पासपोर्ट व शिक्का हे दोन विशेष उपक्रम करण्यात येणार आहेत.
‘ॲक्वा लाईन time capsule’ हा भारतातील मेट्रो क्षेत्रातील अशा स्वरूपाचा पहिलाच उपक्रम आहे. ‘ॲक्वा लाईन’च्या उभारणीपासून ते तिच्या कार्यान्वयनापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे, महत्त्वाचे टप्पे आणि आठवणी यात जतन केल्या जाणार आहेत. सन २०२६ मधील ‘ॲक्वा लाईन’ आणि मुंबईचे एक चित्र पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रवाशांना ‘ॲक्वा लाईन’चा प्रवास अधिक आनंददायी आणि वेगळ्या पद्धतीने अनुभवता यावा यासाठी ‘ॲक्वा लाईन पासपोर्ट व शिक्का’ हा उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रवासी आणि मेट्रोप्रेमींना मार्गिकेवरील निवडक स्थानकांना भेट देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण स्थानक- शिक्का संग्रहित करता येणार आहेत.
Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी
यावेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, “‘ॲक्वा लाईन’च्या संपूर्ण मार्गावरील सेवेला एक वर्ष पूर्ण होत असताना, तिला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारल्याबद्दल मी मुंबईकरांचे मनापासून आभार मानते. ७ कोटी प्रवासी प्रवासांचा टप्पा गाठणे हा मुंबईकरांचा ‘ॲक्वा लाईन’वरील विश्वास आणि पाठिंबा दर्शवणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. Time capsule आणि पासपोर्ट व शिक्का संग्रह हे उपक्रम या सामूहिक प्रवासाचा आनंद साजरा करण्यासोबतच त्याच्या आठवणी पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
मुंबईकरांनी त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी यापुढेही ‘ॲक्वा लाईन’ची निवड करत राहावी, अशी MMRC ची अपेक्षा आहे.( समाप्त )






