Yavatmal News: टिपेश्वर अभयारण्यात नियमांची पायमल्ली! परिसरात १० कॉटेजची परवानगी, प्रत्यक्षात १५ उभारले
Yavatmal News: टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये पर्यटन विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. वनविभागाच्या चौकशी पथकाने केलेल्या स्थळपाहणीत तब्बल १७ पर्यटन प्रकल्पांमध्ये अनियमितता आढळली असून, त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. एका प्रकल्पाला १० कॉटेज उभारण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात १५ कॉटेज उभारण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच तात्पुरत्या निसर्ग पर्यटन सुविधांच्या नावाखाली पक्की बांधकामे करण्यात आली आहेत.(फोटो सौजन्य – istock)
टिपेश्वर परिसरातील अनधिकृत रिसॉर्ट बांधकामांविरोधात यवतमाळ जिल्हा ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावली होती. यादरम्यान, १५ जून २०२६ मध्ये सहायक वनसंरक्षक यांनी १७ पर्यटन आस्थापनांची पाहणी केली. यात जिल्हास्तरीय देखरेख समितीची पूर्वपरवानगी न घेता बांधकामे आणि पर्यटन व्यवसाय सुरू केल्याचे आढळले. वारंवार सूचनापत्र देऊनही संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. १६ जूनला पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाईची शिफारसही करण्यात आली.
१८ सप्टेंबर २०१८ रोजी इको सेन्सिटिव्ह झोनची अंतिम अधिसूचना जारी झाली; मात्र आठ वर्षांनंतरही झोनल मास्टर प्लॅन अंतिम झालेला नाही. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी शासनाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, सील किंवा दंडाबाबत ठोस प्रकल्पांवरील कारवाई आणि मास्टर प्लॅनबाबत याकडे लक्ष लागले आहे.
टिपेश्वरच्या जंगलात वाघ आणि अन्य वन्यजीवांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पर्यावरणीय संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळणे महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी वन्यजीवांच्या अधिवासाशी तडजोड करता येणार नाही. त्यामुळे टिपेश्वरमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देताना पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी होणार की नियमभंग करणाऱ्या प्रकल्पांना अभय मिळणार, हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे.






