Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी, सौजन्य : एआय
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागातील काही निवडक भागांमध्ये नागरिकांना अत्यंत प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मान्सून निघून गेल्याने महाराष्ट्राच्या हवामानाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. वाढलेले तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास वाढला असून नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे. राज्यातील बऱ्याच भागातील हवामान पूर्णपणे कोरडे पडले असून फक्त तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता उरल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एकप्रकारे यंदाचा ऑक्टोबर महिना डोक्याला ताप देणार हे यातून निश्चित झाले आहे.
सध्या मुंबईसह अनेक कोकणपट्ट्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचले आहे. स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांच्या मते, मान्सूनच्या परतीच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता अत्यंत नगण्य अशीच आहे. सध्या पाकिस्तान भागातून भारताच्या दिशेने पश्चिमी वाऱ्यांचे प्रवाह तयार होत आहेत, तर दक्षिण भारतात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरबी समुद्र आणि लगतच्या परिसरातील वाऱ्यांच्या बदलत्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामान तयार झाले आहे. देशात एका बाजूला देशातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू असताना, दुसरीकडे, काही भागांत तीव्र उष्णतेची लाट अनुभवण्यास येत आहे. याशिवाय, झारखंड आणि बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्यामुळे हवामानाचा हा संपूर्ण पॅटर्न बदलल्याचे पाहण्यास मिळत आहे.
नागरिकांनी ही काळजी घ्या
भरपूर पाणी प्या : शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा फळांचा रस प्या.
दुपारचे ऊन टाळा : दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय थेट सूर्यप्रकाशात फिरणे टाळा.
पोशाख : घराबाहेर पडताना सुती (कॉटनचे) आणि हलक्या रंगाचे कपडे वापरा. तसेच डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा.
बालके आणि वृद्धांची काळजी : लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना उष्णतेचा त्रास लवकर होऊ शकतो, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या.






