
मेट्रो 9 टप्पा-2च्या चाचण्यांसाठी 10 दिवस विशेष ब्लॉक
Mumbai News : मेट्रो मार्गिका ९ टप्पा २ कार्यान्वित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून, या टप्प्यातील तीन अतिरिक्त स्थानकांचे कार्यरत मेट्रो मार्गिका ९ टप्पा-१ तसेच विद्यमान मेट्रो नेटवर्कशी सुरळीत एकात्मिकरण करण्यासाठी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) तर्फे आवश्यक सिग्नलिंग आणि मेट्रो गाड्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
या महत्त्वपूर्ण पूर्व-कार्यन्वयन चाचण्यांसाठी १५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष सकाळचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा १ वरील प्रवासी सेवा सकाळी ६:३० वाजता सुरू होतील.
या विशेष ब्लॉकमुळे तांत्रिक पथकांना प्रवासी सेवा सुरू नसलेल्या कालावधीत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे मायग्रेशन, चाचणी आणि प्रमाणीकरण सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सलग वेळ उपलब्ध होईल. त्याचवेळी प्रवासी सेवांवरील परिणाम केवळ सकाळच्या मर्यादित कालावधीपुरता ठेवण्यात आला आहे.
मेट्रो मार्गिका ९ टप्पा २ च्या वेग चाचण्यांसाठी आवश्यक सिग्नलिंग सॉफ्टवेअर आता उपलब्ध झाले असून, त्यामुळे चाचणी आणि कार्यान्वयन प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मार्गिका ९ टप्पा-२ चे कार्यरत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा-१ शी सुरळीत एकात्मिकरण करण्यात येणार असल्याने, नवीन टप्प्यावरील सिग्नलिंग प्रणालीची विद्यमान कार्यरत नेटवर्कसोबत चाचणी आणि प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेत चारकोप डेपो येथील ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (OCC) मार्फत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे नियंत्रित मायग्रेशन आणि चाचणी करण्यात येणार आहे. विद्यमान मार्गिकांवर नियमित वेळेत प्रवासी सेवा सुरू असल्याने, अशा महत्त्वपूर्ण तांत्रिक चाचण्या केवळ प्रवासी सेवा बंद असलेल्या नियंत्रित कालावधीतच करता येतात.
त्यामुळे निर्धारित सुरक्षा आणि परिचालन मानकांनुसार एकात्मिकरण चाचण्या पूर्ण करण्यासाठी हा विशेष सकाळचा ब्लॉक आवश्यक आहे.
प्रवाशांनी १५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा १ वरील प्रवासी सेवा सकाळी ६:३० वाजता सुरू होतील, याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
मेट्रो मार्गिका ९ टप्पा-२ सुरक्षितपणे कार्यान्वित करण्याच्या दिशेने आवश्यक चाचण्या पूर्ण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या या तात्पुरत्या परिचालन बदलादरम्यान प्रवाशांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल MMMOCL आभार व्यक्त करते.