
Mumbai Siren
Mumbai News : मुंबई शहरात 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीदरम्यान शहरातील काही भागांमध्ये सायरनचा आवाज ऐकू येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या आवाजामुळे घाबरून जाऊ नये, असं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, शहरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे अचानक सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांमध्ये भीती किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच नागरिकांना माहिती दिली आहे.
मुंबईतील फोर्ट परिसरातील जुने सचिवालय, जोड इमारत तसेच क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतीवर प्रोटोटाइप सायरन उपकरणे बसवण्यात आली आहेत. याच ठिकाणी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी सायरनची चाचणी करण्यात येणार आहे.
महासंचालक (नागरी संरक्षण, नवी दिल्ली) यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) यांच्या पथकाने हे प्रोटोटाइप सायरन उपकरण तयार केले आहे.
ही सायरन चाचणी पूर्णपणे पूर्वनियोजित आहे. शहरात कोणतीही प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही किंवा कोणताही धोका नाही. त्यामुळे सायरनचा आवाज ऐकून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
तसंच, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांमधून कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असं प्रशासनाने आवाहन केलं आहे. नागरिकांनी या चाचणीसाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असंही सांगण्यात आलं आहे.
8 आणि 9 ऑक्टोबरला सायरनचा आवाज ऐकू आला, तरी ही आपत्कालीन परिस्थिती समजू नका. ही केवळ प्रोटोटाइप सायरन उपकरणाची पूर्वनियोजित चाचणी आहे.